---Advertisement---

आता घरबसल्या करा वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज…जाणून घ्या

On: November 19, 2020 12:44 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे- जमिनीवर कर्जाचा बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुंटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी नोंदी करण्यासाठी आता नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

कारण महसुल विभागाने नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली असून महाभूमि या संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. यासुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचला असून पुणे जिल्ह्यात मागील महिनाभरात सुमारे 1 हजार 100 नोंदी या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या आहेत.

महसूल विभागाने अधिकाधिक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या आहेत. डिजिटल सातबारा उतारा, ई फेरफार अशा प्रमुख सुविधांचा यामध्ये समावेश आहे. करोनाच्या काळात ऑनलाईन सुविधेचे महत्त्व नागरिकांना पटू लागले आहे. नागरिकांना सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाऊ लागू नये, यासाठी डिजिटल सातबारा उपलब्ध करून दिला आहे. आता याच्या पुढील पाऊल म्हणजे कोणत्याही कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, अशी शासनाची भूमिका आहे. त्यानुसार शासनाने वारसनोंद, कर्जाचा बोजा दाखल करणे आदी नोंदींसाठी ई हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. मयत व्यक्तीनंतर त्यांच्या वारसाची नोंद घेण्यासाठी नागरिकांना महाभुमि या संकेतस्थळावर अथवा pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिंग करून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

हा ऑनलाईन अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जांची ऑनलाईन पडताळणी करतील. कागदपत्रे अपूर्ण असेल तर त्याची माहिती अर्जदाराला मेलद्वारे कळविण्यात येईल. सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर तलाठी त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेणार आहे.

अनेक शेतकरी शेतीपीक अथवा उद्योग व्यवसायासाठी बॅंकांकडून कर्ज घेतात. कर्ज घेतल्यानंतर संबंधित कर्जदाराच्या जमिनींवर बोजा चढविणे अथवा कर्ज फेडल्यानंतर तो बोजा काढून घेण्यासाठी बॅंका व कर्जदार यांना त्रास सहन करावा लागतो. “इ- हक्क’ ही प्रणाली देखील बॅंकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर बोजा टाकणे अथवा काढण्यासाठी बॅंकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात त्यांची नोंद घेतली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!