मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावातही राजकारण तापणार आहे.
करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे. राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे.
23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
एकतीस डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल चार जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसंच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 4 जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल आणि 15 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.