मुंबई : जवळपास वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. राज्यातील २८५ केंद्रावर २८ हजार ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर आता राज्यातील सर्वसामान्यांना लस कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे. यासर्वांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिली आहेत
लस प्राधान्यक्रमानुसार देणार
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. त्यात प्राधान्यक्रमानुसार, रुग्णवाहिका चालक, परिचारिका, डॉक्टर, वॉर्डबॉय यांना लस देण्यात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता कर्मचारी, जेष्ठ नागरिक आणि नंतर सर्वसामान्यांना लस दिली जाईल, असं आश्वासन राजेश टोपे यांनी दिलं आहे.
राज्यातील सर्व गरजूंना लस मिळेल
पहिल्या टप्प्यात राज्यासाठी १७. ५० लाख डोस आवश्यक होते. मात्र, आजवर ९. ८० लाख डोस प्राप्त झाले आहेत. उर्वरित डोस लवकर उपलब्ध होतील, असं टोपे म्हणाले आहे. शिवाय, दारिद्रय रेषेखालील सर्वांना मोफत लस मिळावी यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील सर्व गरजूंना लस मिळेल, कोणालाही राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. आपण प्रत्येकजण कोरोना प्रतिबंधक लसीची वाट पाहत होतो. आता लसीकरणास सुरुवात झाली आहे. ही लस सुरक्षित होती आणि आहे. याबाबतीत आम्ही यापूर्वीही सांगितलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा हाच संदेश दिलाय. कोव्हिड योद्ध्यांनी आपल्या सर्वांचे प्राण वाचवले. ११ महिने त्यांनी जीव धोक्यात घालून मेहनत केली. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना आधी लस दिली, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.