मुंबई : राज्यात ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्ष नावालाही उरणार नाही, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मित्र आहेत पण ते काहीही बोलतात, अशी कोपरखळी देखील त्यांनी काढली.
फडणवीस यांनी सत्तांतरांचे संकेत देत फासा आम्हीच पलटणार, असे विधान 5 फेब्रुवारी रोजी केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना पटोले यांनी वरील विधान केले. “देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. पण ते काहीही बोलतात. राज्यात ऑपरेशन लोटस वगैरे काहीही होणार नाही. भविष्यात भाजप हा पक्ष उरणार नाही,” असे नाना पटोले म्हणाले. तसेच पुढे बोलताना पटोले यांनी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले.
त्यांनी “देशातील सेलिब्रिटींना सरकारच्या बाजूने आता ट्विट करता येतं. पण त्यांना जनतेच्या प्रश्नांवर ट्विट करता येत नाही,” असे म्हणत क्रिकेटपटू आणि सिनेतारकांना धारेवर धरलं. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं आश्वासान दिलं नव्हतं असं वक्तव्य करुन महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. शाहांच्या वक्तव्यावर बोलताना, “भाजप आणि शिवसेनेत काय बोलणं झालं हे मला माहिती नाही. शाह तब्बल एका वर्षांने बोलले आहेत. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ आहे का?, असा सवाल करत शाहांच्या वक्तव्याची पटोले यांनी खिल्ली उडवली.