बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारील घरामध्ये एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बारामतीत एकच खळबळ उडली आहे. प्रीतम शाह असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलाने बारामती पोलिसांकडे नऊ जणांविरोधात तक्रार केली आहे. या प्रकरणामध्ये सहा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून तीन जण फरार असल्याचे वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.
सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
या चिठ्ठीमध्ये काही सावकार आपल्याला त्रास देत असल्याचे शाह यांनी म्हटलं आहे. याच लोकांच्या जाचाला आपण कंटाळलो असून निराशेमुळे आपण आत्महत्या करत आहोत, असंही या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, सावकारी प्रकरणामधून एका व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली बारामती पोलिसांनी शहरातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आणि शाह यांच्या मुलाने नावं घेतलेल्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यांच्या नावांचा उल्लेख
शाह यांच्या मुलाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नगरसेवक जयसिंह देखमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रवणी गालिंदे, हनुमंत गवळी, सुनील अवाळे, संघर्ष गव्हाळे, मंगेश आमासे यांच्या नावांचा उल्लेख आहे. यापैकी एकजण बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहे. प्रीतम यांनी दाखल केलेल्या तक्रारीमधील जवळवजवळ सर्वजण राजकारणाशी संबंधित आहेत. आरोपींपैकी काहीजण नगरसेवक असून बारामती सहकारी बँकेच्या संचालकपदी असणाऱ्या व्यक्तीचाही आरोपींच्या यादीत समावेश असल्याचे वृत्त आहे.
आरोपींनी प्रतीम शाह यांना ३० टक्के व्याजाने पैसे दिले होते. प्रीतम यांनी हे सर्व पैसे परत केल्यानंतरही आरोपी त्यांच्याकडून अधिक पैशांची मागणी करत होते असा आरोप केला जात आहे. पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत आहेत.