ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाढीव वीजबिलांविरोधात मनसे आक्रमक ; ठाणे, पुण्यातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : वीज बिलांच्या विरोधात मनसेने गुरूवारी राज्यभरात ‘झटका मोर्चा’चं आयोजन केलं आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

या दरम्यान, मनसेने काढलेल्या ठाण्यातील धडक मोर्चेला पोलिसांनी अडवले. त्यानंतर नेते अविनाथ जाधव, अभिजीत पानसे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसेची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे.

‘सरकारच्या दडपशाहीला न जुमानता वाढीव वीजबिलांविरोधात मनसे मोर्चा काढणारच’, अशी आक्रमक भूमिका मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी घेतली होती. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी मनसे नेते रस्त्यावर उतरणार असल्याचे ते म्हणाले होते. ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात येणार होता. त्यानुसार, आज, पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मध्यवर्ती कार्यालयाजवळ एकत्र आले. सुरुवातीला पोलिसांनी मनसेचा मोर्चा अडवला. मात्र, पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मोर्चा पुढे काढला. काही अंतरावर कूच केल्यानंतर पोलिसांनी पुन्हा मोर्चा रोखला. त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव, अभिजीत पानसे यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

तर  दुसरीकडे, पुण्यातील  मनसे मोर्चामध्ये सरकारला शॉक देण्यासाठी काही युवकांनी अंगाला वायर गुंडाळाल्या आहेत.  पोलिसांनी शहरप्रमुखांसह ५० ते ६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन फरासखाना पोलीस ठाण्यात नेले. मात्र, आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. तसेच जोरदार घोषणाबाजी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!