पंढरपूर : आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. 4) येथील संत तुकाराम भवन येथे सकाळी 8.30 वाजता विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकरी महाराज मंडळींची बैठक होणार आहे. 13 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीकडे वारकरी भाविकांचे लक्ष लागले आहे.
समाधी सोहळ्याकडे वारकरी भाविकांचे लक्ष?
पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेनंतर वारकऱ्यांना वेध लागते ते आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळयाकडे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी, कार्तिकीसह सर्वच प्रमुख यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. यानंतर आता 8 ते 14 डिसेंबर दरम्यान आळंदी येथे साजऱ्या होणाऱ्या संजीवन समाधी सोहळ्याकडे वारकरी भाविकांचे लक्ष लागले आहे. 13 डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीकडे वारकरी भाविकांचे लक्ष लागले आहे.
पंढरपूरची कार्तिकी यात्रा ज्या पद्धतीने साजरी केली जाते, त्याच पद्धतीने आळंदीची वारी साजरी करावी, अशी मागणी वारकरी महाराज मंडळींनी केली आहे कार्तिकी यात्रेदरम्यान येथील काही वारकरी महाराज मंडळींनी अलीकडेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आळंदी वारीसंदर्भात वारकरी महाराज मंडळींशी चर्चा करण्यासाठी श्री. पटोले हे उद्या पंढरपुरात येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे सदस्य तथा वारकरी – फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिली.