मुंबई : येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण सोनिया गांधी येत्या काळात सेवानिवृत्त होत असून त्या पदाची सूत्र शरद पवार यांच्या हाती दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये आणि हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वाकडे याबाबत विचारणा केली होती. तर काही नेत्यांनी काँग्रेसची सूत्र पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणीही केली होती. परंतु राहुल गांधी यांनी यापूर्वी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सोनिया गांधी रिटायरमेंट घेतल्यानंतर ही जबाबदारी कोणाकडे द्यायची याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार UPAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर त्यांना पंतप्रधापदाचे उमेदवार व्हावे यासाठी काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांनी गळ घातल्याची देखील चर्चा आहे.
शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये युती केली होती. परंतु निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतरही शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सरकार स्थापन केलं होतं.
देशात सध्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. विरोधकांच्या एका शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी राहुल गांधीदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. अशावेळीही त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शरद पवार यांनी केलं होतं. २००४ पासून सोनिया गांधी या युपीएच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.