मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना युपीएचं अध्यक्षपद दिल्याची चर्चा सध्या रंगली आहे. पंरतु खुद्द शरद पवार यांनी अशा प्रकारच्या विधानात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता या विषयावर भाष्य करताना परखड मत मांडले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यूपीएचं अध्यक्षपद आता शरद पवारांकडे देण्याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं. “शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा आणि त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. यूपीएच्या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर मी बोलणं योग्य ठरेल”, असं संजय राऊत म्हणाले होते. परंतु “शरद पवार जर युपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही, असंही ते म्हणाले.
शरद पवार महाराष्ट्राचे, देशाचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत. पण जेव्हा युपीए अध्यक्षपदाबाबत आपण बोलत आहोत तेव्हा तसा कोणाताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. ही गोष्ट जर शरद पवारांनी स्वत: सांगितली असेल तर त्यावर चर्चा करणं योग्य नाही”.