ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का? याचे उत्तर द्यावे ; किरीट सोमय्या

मुंबई : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपाने हाच मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे व्हिडियो ट्विट करत ठाकरे सरकारवर  निशाणा साधला आहे.


शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला कि काय असं म्हणत या व्हिडियोमध्ये शिवसेनेला सवाल विचारत डिवचलं आहे.  ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे का, असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने सध्या राज्यात शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरला असून त्या माध्यमातून शिवसेनेची कोंडी केली जात आहे. औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे, ही शिवसेनेची पूर्वीपासूनची मागणी आहे. मात्र, आता काँग्रेससोबत सत्तेत बसल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. तर काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!