नवी दिल्ली । दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू याचं नाव चर्चेत आहे.
दीप सिद्धूने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावलं, असा आरोप शेतकरी नेते करत आहेत. दीप सिद्धूने आंदोलकांना चिथावलं आणि त्यांची दिशाभूल केली, असा आरोप भारतीय किसान युनियन हरयाणाचे प्रमुख गुरनामसिंग चधुनी यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनीही दिप सिद्धू यांच्यावर आरोप केले आहेत. दीप सिद्धूनेच आंदोलकांना लाल किल्ल्यावर नेले. शेतकरी तिथे जाण्याच्या बाजूने कधीच नव्हते. गुरनामसिंग चधुनी यांच्यासह स्वराज पक्षाचे योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू यावर आरोप केला आहे. दीप सिद्धू अनेक दिवसांपासून आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत होता. तो भाजपशी संबंधित आहे, असा आरोप यादव यांनी केला.
“दिपू सिद्धू आणि गँगस्टर ते नेता असा प्रवास केलेल्या लखा सिधाना यांनी काल रात्री सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भडकावण्याचं काम केलं”, असा थेट आरोप यादव यांनी केला आहे. यासोबतच एक मायक्रोफोन घेऊन दिप सिद्धू लाल किल्ल्यापर्यंत कसा पोहोचला याचीही चौकशी व्हायला हवी, असंही ते पुढे म्हणाले. योगेंद्र यादव यांच्यासोबच भारतीय किसान युनियनचे हरियाणा प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह यांनीही दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.
२०१९ साली अभिनेते सनी देओल यांनी भाजपकडून गुरुदासपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळी देओल यांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या टीममध्ये दिप सिद्धू यांनाही सामील केलं होतं. दीप सिद्धू हा लोकसभा निवडणुकीत भाजप खासदार सनी देओल एजंट होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याचे बरेच फोटो आहेत. याबाबत आम्ही दिल्ली पोलिसांना बर्याचदा सांगितलं होतं. पण कोणतीही कारवाई झाली नाही. त्याचे फोटो समोर येऊनही त्याला अटक करण्यात आलेली नाही. यामुळे दिल्लीच्या हिंसाचारामागे षडयंत्र असण्याची शक्यता आहे, असं योगेंद्र यादव म्हणाले. काँग्रेस खासदार रवनीतसिंग बिट्टू यांनीही असाच काहीसा दावा केला आहे. दीप सिद्धू यानेच लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला. सिख फॉर जस्टिस (SFJ) या बंदी घातलेल्या संघटनेचा तो सदस्य आहे. असं त्यांनी सांगितलं.
लाल किल्ल्यावरील घटनेनंतर दीप सिद्धूने फेसबुक लाइव्ह केलं. आम्ही केवळ लाल किल्ल्यावर ‘निशान साहिब’ (झेंडा) फडकावला आहे. आणि विरोध करणं हा आमचा हक्क आहे. आम्ही तिरंगा काढला नाही, असं तो दीप सिद्धू म्हणाला. “आंदोलनामुळे लोकांचा रोष वाढला आणि आंदोलकांना भडकवण्यासाठी कुठल्या एका व्यक्तीला जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आमचे शेतकरी प्रदर्शन करत आहेत आणि आज जे झालं ते त्याला वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जाऊ शकत नाही”, असं दिप सिद्धू म्हणाला.
शेतकरी आंदोलनात कसा शिरला दिप सिद्धू
देशातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि सिनेक्षेत्रातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यानुसार २५ डिसेंबर रोजी अनेक कलाकार सिंघू सीमेवर पोहोचले होते. त्यातच दिप सिद्धू देखील होता त्याने शेतकऱ्यांसोबतच धरण आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहनही सोशल मीडियातून केलं.