अक्कलकोट,दि.१६ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास रब्बी
पिकांसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले.त्यामुळे अक्कलकोट,मैंदर्गी,दुधनीसह नदीकाठच्या गावचा आणि शेतीचा पाणी प्रश्न मिटला आहे.हे पाणी उद्या बुधवारी सकाळपर्यंत शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पोचणार आहे,अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.पाणी सोडतेवेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा,शाखा अभियंता रोहित मनलोर,कालवा निरीक्षक प्रशांत लोंढे,माजी बिटधारक एन.व्ही.उदंडे,राहुल काळे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.चार दिवसापूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती.त्यावेळी बोरी नदीवरील बंधारे किरकोळ दुरुस्त करून पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता.त्यानुसार पाटबंधारे विभागाने सकाळी ही कार्यवाही सुरू केली.यात धरणाचे चार दरवाजे
प्रत्येकी एक ते दीड इंच उचलून त्यातून सहाशे क्युसेक्स
पाणी खाली सोडण्यात येत आहे.धरणात सध्या ८५
टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्यातून आता २० टक्के पाणी कमी होणार आहे.सोडलेले पाण्यातून अक्कलकोट,सांगवी,ममदाबाद,निमगाव,सातनदुधनी,
रुददेवाडी,बबलाद,सिंदखेड ही आठ बंधारे भरून घेतली जाणार आहेत.त्याचा फायदा तीन नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसह नदीकाठवर अवलंबून असलेल्या गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.सध्या अनेक
ठिकाणी रब्बी पिके वाळून जात आहेत.काही गावांनी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर
त्यांना हे पाणी उपयुक्त ठरणार आहे.योग्यवेळी प्रशासनाने निर्णय घेतल्याने नदीकाठच्या गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे,अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.हे पाणी किमान दोन महिने शेतकऱ्यांना पुरेल,असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
धरणात ६५ टक्के
पाणी शिल्लक राहणार
पाणी सोडण्याची प्रक्रिया दोन दिवस चालेल.
त्यानंतर धरणात ६५ टक्के पाणी शिल्लक राहणार आहे.त्यानंतर तीन महिने शिल्लक पाणी टिकवावे लागेल.त्यादृष्टीने येत्या काळात पाण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.