अक्कलकोट, दि.१८ : कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे सध्या कुरनूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा झाला
आहे. पाऊस असाच पडल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढू शकते ,असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे.
पावसाळा सुरू होऊन चार महिने पूर्ण होत असले तरी म्हणावा तसा पाऊस नसल्याने धरणाची पाणी पातळी वाढली नव्हती. त्यामुळे अक्कलकोटसह तालुक्यातील शेतकऱ्यांना धरणाच्या पाणी पातळीत वाढ कधी होणार याची चिंता सतावत होती मात्र गेल्या दोन दिवसापासून सातत्याने हरण आणि बोरी नदीच्या परिसरात पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार कुरनूर धरणांमध्ये ३०५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्याची माहिती त्यांनी दिली. धरणाची एकूण क्षमता 822 दशलक्ष घनफूट असून दरवर्षी हे धरण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यातच भरत असते. यावेळीही त्याच पद्धतीने वाटचाल सुरू आहे हे धरण पूर्णपणे तुळजापूर, नळदुर्ग आणि हरणा नदीकाठच्या परिसरातील गावांवर अवलंबून आहे. त्यामुळे या भागात पाऊस जर झाला तरच धरणाची पाणी पातळी वाढू शकते .अक्कलकोट तालुक्यात इतर ठिकाणी बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ओढे, पाझर तलाव याठिकाणी पाणी आले आहे. शिरवळवाडी, घोळसगाव यासारख्या मोठ्या तलावांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे .
अक्कलकोट तालुक्यातील पावसाची आकडेवारी
अक्कलकोट : ०१ (२९४)
चपळगाव : ०० (३६२)
वागदरी : १६ (३३४)
किणी : ०३ (४११)
मैंदर्गी : ०४ (३०८)
दुधनी : ०७ (४५५)
जेऊर : ०० (२२३)
करजगी : ०८ (२१९)
तडवळ : १८ (२२३)
एकूण ■ ५७ (२८२९ मि मि) नऊ मंडळ
सरासरी एकूण
पाऊस : ३१४.३३ मिमी