पुणे : समकालीनता हे उच्चप्रतीच्या साहित्याचे मूल्य असते. असे समकालीन साहित्य लिहिण्याची प्रेरणा साहित्यिकांनी घ्यावी, असे प्रतिपादन श्री रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी पुण्यात बोलताना केले. चपराक प्रकाशनाच्यावतीने आयोजित साहित्य मेळाव्यात राज्यभरातील १५ लेखकांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रदीप रावत प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात सोलापूरचे साहित्यिक आणि आकाशवाणी सोलापूरचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांच्या ‘शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर’ या कविता आणि गाण्यांच्या रसग्रहणात्मक लेखसंग्रहाचं प्रकाशन झालं.
आपल्या भाषणात गोविंददेव गिरी यांनी प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या धाडसी लेखणी, वाणी आणि प्रकाशनाचा गौरवाने उल्लेख केला. ते म्हणाले, “सध्याच्या काळात गुळमुळीत राहून चालणार नाही. देशविघातक शक्ती उघडउघड काम करत असताना आणि त्यासाठी विकले गेलेले लेखक विकृत लेखन करत असताना कुणीतरी धाडसाने पुढे येऊन ‘चपराक’ लावणे गरजेचे असते. देशविरोधी प्रवृत्तींविरुध्द प्रतिकार करण्यासाठी साहित्यिकांच्या प्रज्ञेला धार आली पाहिजे. अशा जीवनसन्मुख साहित्यातूनच उन्नत समाजाची निर्मिती होत असते.”
साहित्यात संस्कृती घडविण्याची शक्ती असते असे मत प्रदीप रावत यांनी यावेळी व्यक्त केले. व्यापक, सखोल आणि समृध्द जीवनानुभव साहित्यात प्रतिबिंबित व्हावा असंही ते म्हणाले.
प्रारंभी घनश्याम पाटील यांनी प्रस्ताविक भाषणात चपराक प्रकाशनाच्या वाटचालीची माहिती देऊन कोरोनाकाळातही वाचनसंस्कृती संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सुनील शिनखेडे यांनी ‘शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर’ या पुस्तकनिर्मितीमागची प्रेरणा स्पष्ट केली. चांगल्या कविता आणि अवीट गोडीची गाणी यांचा रसास्वाद रसिकांना घडावा यासाठी लिहिले आणि आनंद वाटून दिला असं ते म्हणाले. या पुस्तकाला कविवर्य ना. धों. महानोर यांची प्रस्तावना आहे. शिनखेडे यांनी हे पुस्तक ‘नव्वदी पार केलेल्या ऐश्वर्यवती आकाशवाणीला’ अर्पण केले आहे.
या कार्यक्रमाला सुधीर गाडगीळ, विजय जोशी, स्नेहा शिनखेडे, सुरेश खानापुरकर यांच्यासह अनेक साहित्य रसिक उपस्थित होते.
या चपराक साहित्य मेळाव्यात दुपारी विविध सत्रात सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती, महादेवी स्वामी-मोरे यांचं गायन आणि निमंत्रितांचं कविसंमेलन हे कार्यक्रम पार पडले. रसिकांनी सर्वच कार्यक्रमांना दाद दिली.