मुंबई : कोरोनावरील लसीच्या सखारात्मक वृत्तांने सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. करोना प्रतिबंधात्मक लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून उत्पादन वेगाने सुरु आहे. परिणामी सोने आणि चांदीवरील दबाव वाढला आहे. गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅमसाठी जवळपास ७,७०० रुपयांची घट झाली आहे. सध्या सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ४८,५२४ रुपये आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात प्रति दहा ग्रॅम १६०० रुपयांची घट नोंदविण्यात आली.
सोन्याचा सर्वोच्च भाव सात ऑगस्टला प्रति दहा ग्रॅमसाठी ५६,२०० रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर साडेतीन महिन्यांच्या कालावधीत हा भाव ७७०० रुपयांनी घटला आहे. याच कालावधीत चांदीच्या प्रति किलो भावामध्येही १७,००० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे.
गुरुवारी मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) चार डिसेंबरच्या सोन्याच्या वायद्यांत ११ रुपयांची किरकोळ वाढ होऊन ते प्रति दहा ग्रॅमसाठी ४८,५२४ रुपयांच्या पातळीवर उघडले. चांदीच्या किमतीतही ०.५० टक्क्यांची तेजी दिसून आली. चांदीमध्ये २९९ रुपयांची वाढ होऊन ती प्रतिकिलोसाठी ६०,१४२ रुपयांवर जाऊन पोहोचली. आगामी काळात लशीच्या आगमनामुळे करोनाची भीती काही अंशी तरी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे.