मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून अर्थव्यवस्था सावरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीची खरेदी वाढली आहे. सलग तीन दिवस सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने ३४० रुपयांनी वाढले आहे. आज दिवसभरात सोन्याचा भाव ४९९५० रुपयांपर्यंत गेला होता. चांदीमध्ये देखील १७०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
मागील तीन दिवसात चांदीमध्ये ३४०० रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा भाव मंगळवारी ५३१ रुपयांनी वधारला. तर बुधवारी त्यात १३० रुपयांची वाढ झाली. सध्या सोने ४२७ रुपयांनी वधारले आहे. तीन दिवसात सोने १००० रुपयांनी वधारले आहे.
भारतात करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. काही देशांत करोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लग्नसराईच्या हंगामात दागिन्यांची मागणी वाढेल असा आशावाद सराफ व्यावसायिक करत आहेत.
सध्या कमॉडिटी बाजारात सोने ५००२४ रुपयांवर आहे. त्यात ४२७ रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत देखील तेजी दिसून आली. एक किलो चांदीचा भाव ६७६५७ रुपये आहे. ज्यात १७४६ रुपयांची वाढ झाली आहे.
good returns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३२० रुपये आहे. तर २४ कॅरेट चा भाव ४९३२० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३६० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२७६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६९५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१२२० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८५६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१२६० रुपये आहे.