सोलापूर : ‘कोरोना’च्या गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची वीजबिलांची थकबाकी वाढली आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपयांची वीज बिलांची थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी जिल्ह्यात 566 वीज थकबाकीदारांकडून 4 कोटी 92 लाख रुपयांची थकबाकी जमा करण्यात आली आहे.
मार्च २०२० मध्ये १ लाख ९१ हजार वीजग्राहकांकडे २८ कोटी ६५ लाखांची थकबाकी होती. ही थकबाकी वसुल करण्यापूर्वीच मार्चमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन सुरू झाला. तेव्हापासून वीजबिल वसुलीवर मोठा परिणाम सुरू आहे. अनलॉकनंतरही थकीत व चालू वीजबिलांची भरणा फारसा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या हलाखीची झाली आहे.
सद्यःस्थितीत जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक औद्योगिक वर्गवारीतील ४ लाख ४६ हजार वीजग्राहकांकडे तब्बल २६५ कोटी ८५ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती ३ लाख ९४ हजार १५० ग्राहकांकडे १८९ कोटी ७० लाख, वाणिज्यिक ४० हजार ४९५ ग्राहकांकडे ४५ कोटी ३६ लाख तर औद्योगिक ९ हजार १५ ग्राहकांकडे ३० कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे.