सोलापूर,दि.२४ : युुुवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच युवकांच्या हाताला काम मिळवून देऊन बेरोजगारी हटविण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासोबत जाऊन मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोलापुरातील युवकांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी शरद पवार यांनी सोलापुरात बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी जातीने लक्ष घालण्याची ग्वाही दिली.सोलापूरच्या एकूणच परिस्थितीची आपणास जाण असल्याचे सांगत पवार यांनी बेरोजगार युवकांसाठी नौकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.सोलापूर युवकचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी बराच वेळ चाललेल्या चर्चेवेळी सोलापुरात युवकांना भेडसावत असलेल्या अडचणी सांगितल्या.तसेच मागील भाजपच्या सरकारने सोलापुरातील युवकांना रोजगार देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याने बेरोजगार युवकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे निदर्शनास आणून दिले.
सोलापूर शहर व जिल्ह्य़ातील बेरोजगारी संपुष्टात येण्यासाठी व युवा वर्गाला सोलापूरातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी आय.टी.पार्कची नितांत आवश्यकता असल्याचे सांगत त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून राज्य सरकार मार्फत योग्य ती पावले उचलावीत अशी विनंती राष्ट्रवादी युवकच्यावतीने मनमोकळ्या चर्चेदरम्यान शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या काळात सोलापुरातील बेरोजगार युवकांकडे म्हणावे तसे लक्ष देण्यात आलेले नाही. परिणामी सोलापुरात बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हाताला काम आणि नौकरी नसल्याने युवकवर्ग वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोलापुरात आयटी पार्क झाल्यास हजारो युवकांना रोजगार मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे जुबेर बागवान यांनी शरद पवार यांना बोलताना सांगितले.यावेळी राष्ट्रवादीचे सोलापुर जिल्हा मिडीया प्रमुख मिलिंद गोरे,करमाळा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिषेक आव्हाड, प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस आदी उपस्थित होते.