ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील बाधितांना 48 लाखांची नुकसान भरपाई

 

सोलापूर (प्रतिनिधी) पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत तीन वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या विविध प्रकारच्या नुकसानीचे 547 प्रकरणे मंजूर झाली असून त्यासाठी तब्बल 48 लाखांची नुकसान भरपाई वनमंत्री संजय राठोड यांनी दिल्याची माहिती आ. सुभाष देशमुख यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आ. देशमुख यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला वनमंत्री राठोड यांनी पत्राद्वारे उत्तर दिले आहे.
पुणे वनवृत्तांर्गत पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यात बिटट्या, तरस, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा या वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याचे निर्दशनास आले आहे. या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात या दोन्ही जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत आ. देशमुख यांनी अधिवेशनात प्रश्‍न विचारला होता. त्याला उत्तर देताना वनविभागाने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेले पीक नुकसानीचे तीन वर्षात 151 प्रकरणे मंजूर करत 13 लाख 58 हजार, पशु हानीचे 381 प्रकरणे मंजूर करत सुमारे 32 लाख 67 हजार तर मनुष्य हानीचे 16 प्रकरणे मंजूर करत 1 लाख 67 हजार असे मिळून 547 प्रकरणे मंजूर करत असून त्यासाठी सुमारे 48 लाखांची नुकसान भरपाई दिल्याचे कळवले आहे. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीपिकाचे नुकसान केलेली 100 प्रकरणे मंजूर केली असून निधी अभावी 1 लाख 68 हजारांची नुकसान भरपाई प्रलंबित असल्याचे कळवले आहे तर उर्वरित नुकसान भरपाई लवकरच देण्याची प्रकिया सुरू असल्याचे वनविभागाने कळवले असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!