सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सावरण्यासाठी पंतप्रधानांकडे विशेष पॅकेजची मागणी – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी
सोलापूर,दि.५ : सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या नुकसानीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कधीच सामना केला नव्हता. हे मोठे संकट सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर असल्याने यातून सावरण्यासाठी खासदार डॉ. जयसिध्देश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी विशेष पॅकेजची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघात सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा पाहणी दौरा केल्यानंतर खासदार डॉ. जयसिध्देश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष पॅकेजच्या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात जिल्ह्यात झालेल्या एकूण परिस्थितीची माहिती देत, 500 कोटींची मागणी केली आहे. भीमा, सिना, बोरी नदीच्या लगत असलेल्या शेतकरी, गावकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे दिवाळी सारख्या मोठ्या सणापुर्वीच शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावला. जिरायती, बागायती सर्वच पिके उध्वस्त झाल्याने तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा या सर्वच तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी संकटग्रस्त आहे. या सर्वच तालुक्यातील तहसीलदार तथा संबंधित प्रशासनासोबत प्रत्यक्ष दौरा केला. परिस्थितीची पाहणी केली असता, अधिक नुकसान झाल्याने तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे.
जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविलेल्या अहवालानुसार ३ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रावरील सुमारे 500 कोटींची आवश्यकता आहे. प्रधानसेवक या नात्याने विशेष पॅकेजची मागणी केली असून यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखी व समाधानी राहिल. अशा संकटग्रस्त परिस्थितीतून सावरेल अशी आशा खासदार डॉ. जयसिध्देश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी या निवेदनात केली आहे.