ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर जिल्ह्यात पर्यटन ग्राम योजना राबवणार

 

सोलापूर,दि.२८ : पंढरपूर तालुक्यातल्या चिंचणी गावाच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात अनेक गावांचा पर्यटन ग्राम म्हणून विकास करण्याची योजना सोलापूर सोशल फाऊंडेशनने आखली असून त्यातून सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला गती देण्याचा निर्धार आहे असे सोलापुर सोशल फाऊंडेशन अध्यक्ष माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख यांनी काल फाऊंडेशनच्या सल्लागार समितीच्या बैठकीत अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे सातारा जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांनी वसवलेले रम्य गाव असून अनेक पर्यटक त्या गावाला भेट देत आहेत. पर्यटन दिनाचे औचित्य साधून सल्लागार समितीची बैठक याच गावात घेण्यात आली. सोलापूर जिल्ह्याच्या निरनिराळ्या क्षेत्रात विकास विषयक काम करणार्‍या सल्लागारांना चिंचणी हे गाव पाहता यावे हाही या बैठकीचे चिंचणीत आयोजन करण्यामागचा हेतू होता.

सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा असा फाऊंडेशनचा उद्देश असून नव व्यावसायिकाना उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत देण्यास आपण सदैव तत्पर आहोत असे आ. सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना जाहीर केले.
या कार्यक्रमात सोलापूर सोशल फाऊंडेशनचा दुसरा वर्धापन वर्ष अहवाल प्रकाशित करण्यात आला. संचालक अभिजीत पाटील यांनी सोलापुर सोशल फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. अजित कंडरे (यलमार), अमित जैन, मोहन अनपट, कृषिभूषण अंकुश पडवळे या सल्लागारांनी जिल्ह्याच्या विकासासाठी करता येतील अशा अनेकानेक उपक्रमांची माहिती दिली.
शेतीमालाला चांंगला भाव मिळावा यासाठी सामूहिकपणाने विक्री आणि मार्केटिंगचे प्रयत्न करण्यावर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते मांडताना भर दिला.
भूषण कुलकर्णी यांनी, सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूरचे ब्रँडिंग करून त्याचे नाव जगात कसे वाढवता येईल याबाबत आपले विचार मांडले.
उ. सोलापूर तालुक्यातील कारंब गावचे विनायक सुतार यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवता येतील याची माहिती दिली आणि सोलापूरचे नाव क्रीडा क्षेत्रात वाढावे यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.सॅटरडे क्लबचे तारासिंग राठोड यांनी नवीन व्यावसायिकांना करीत असलेल्या मार्गदर्शनाची माहिती दिली. माजी पोलीस उप अधीक्षक माडगूळकर यांनी वृक्षारोपणात जिल्हा अग्रेसर रहावा यासाठी आखावयाच्या व्यापक मोहिमेची माहिती दिली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोलापूर सोशल फाऊंडेशन अध्यक्ष आ.सुभाष बापू देशमुख होते तर संचालक अभिजित पाटील, सौ.पूर्वाताई वाघमारे, सल्लागार रवींद्र मिणियार, बॉबी मेनन, भूषण कुलकर्णी, मेजर शामराव कदम,पांडुरंग वाघमोडे, प्रा. काटिकर सर,कृषिभूषण अंकुश पडवळे, शिवाजीराव पवार, उद्योजक अजित कंडरे(यलमार), अमित जैन, विनायक सुतार,प्रदीप नागणे, सॅटरडे क्लब सोलापूर चे तारासिंग राठोड, मयूर येलपले, माजी पोलीस उप अधीक्षक माडगूळकर साहेब, चिंचणी गावचे मोहन अनपट ,आनंद माळी साहेब, कृषी उत्पादक कंपनी चे चेअरमन श्री कुलकर्णी, सतीश काळे, गोविंद विभूते,सरपंच कौलगे, पंचायत समिती सदस्या पल्लवी कंडरे ताई, मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड, विजय कुचेकर, अनिल कांबळे, दत्तात्रय चौगुले आदी मान्यवर व चिंचणीकर ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवाजीराव पवार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!