कोल्हापूर । राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. तक्रार मागे घेतल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
दरम्यान, यानंतर खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ‘हनी ट्रॅप’ ही महाराष्ट्राची संस्कृती नसून हा विषय आता पुरे झाला, राज्यासमोर त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न असून सर्वांनी त्यावर लक्ष द्यावे, असे सुळेंनी म्हटले. शुक्रवारी कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी त्या शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार रेणू शर्मा या महिलेने मागे घेतली त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या, ”व्यक्तिगत आयुष्यात काय घडले हे शोधण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे हा विषय आता पुरे झाला, राज्यासमोर त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न असून सर्वांनी त्यावर लक्ष द्यावे,” असेही सुळेंनी म्हटले. दरम्यान, जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री व्हावे वाटते, या वक्तव्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यामुळे अजित पवार यांनीही त्यात गैर काय असे म्हटले आहे, याची आठवणही सुप्रिया सुळेंनी करुन दिली.