मुंबई : ‘ताज’ हॉटेलला ९ कोटींची दंडमाफी देणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे. ‘ही तर टाटा, बिर्लांची सेना आहे,’ असा खोचक टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हाणला आहे.
महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला…तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना? असा सवाल आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यामातून केला आहे. “टाटांच्या हॉटेल ताजला 9 कोटींची सूट द्यायला निघालेल्या मुंबई महापालिकेने ‘बीएसई’वर मात्र कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेची कंत्राटे मुलाला आणि जावयाला…तर करात सवलती टाटा आणि बिर्लांना???… वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना!!”,असे ट्विट आशिष शेलार यांनी करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुलाबा येथील ताज आणि नरीमन पॉइंट परिसरातील ट्रायडंट हॉटेलच्या बाहेरील रस्ते आणि पदपथ सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी बंद केले होते. गेल्या काही वर्षांत ताज हॉटेलनं बंद केलेल्या पदपथांवर झाडाच्या कुंड्या, तसंच अन्य साहित्य ठेवून अतिक्रमण केलं. त्यामुळं महापालिकेनं हॉटेलला ८ कोटी ८५ लाख रुपये दंड ठोठावला होता. यापैकी ‘ताज’नं ६६ लाख रुपये भरले आहेत. मात्र, आता महापालिकेनं दंडमाफी करत या वादावर पडदा टाकला आहे.