मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेनेसह महाविकास आघाडीतील टीका करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिलं. ‘दहा वर्षांपूर्वीचं बोलू नका. आज काय चाललंय ते बघा आणि त्यावर बोला,’ असं राऊत यांनी फडणवीसांना सुनावलं. ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
“आता हे उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांबपर्यंत जाईल. आज देशात काय सुरु आहे. १० वर्षापूर्वीचं बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे, त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसने आवाहन केलेलं नाही. जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे त्याला कोणतंही राजकीय पाठबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतलं पाहिजे. त्याच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे”.
फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ‘भारत बंद’ला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाविकास आघाडीचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा हा केवळ राजकारणाचा भाग आहे. या तिन्ही पक्षांनी यापूर्वी वेळोवेळी कायद्यातील तरतुदींना पाठिंबा दिला आहे. ‘एपीएमसी’तून फळे व भाजीपाला नियमनमुक्त व्हावा याला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी स्वत: संसदेत तशी भूमिका मांडली होती, ही आठवण फडणवीस यांनी करून दिली होती.