शिरवळसह सहा आरोग्य केंद्रात हाल लाऊड क्लिनिक मशीन कार्यान्वित ; ग्रामीण रुग्णांना होणार लाभ, २३ तपासण्या एकाच मशिनवर होणार
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळसह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हाल क्लाऊड क्लीनिक मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारे २३ तपासण्या तेही तात्काळ उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे ग्रामीण रुग्णांची मोठी सोय होणार आहे.
शिरवळ येथे जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्या प्रयत्नातून आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही मशीन उपलब्ध झाली आहे.याचा लोकार्पण
सोहळा त्यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या मशीनद्वारे अनेक प्रकारच्या तपासण्या करून रिपोर्ट जागेवर देता येतो. जसे की वजन, उंची, तापमान, ऑक्सिजन लेवल, डोळ्याचे व्हिजन, ब्लड शुगर, हिमोग्लोबीन अशा अनेक प्रकारच्या एकूण २३ तपासण्या एकाच मशीनवर आपण एकाच ठिकाणी करू शकतो.
याचा जास्तीत जास्त उपयोग गोरगरिबांना, जेष्ठ नागरिकांना, गरोदर मातांना होणार आहे. इतक्या सगळ्या तपासण्या करण्यासाठी बराच वेळ जातो, पैसा खर्च होतो आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून या तपासण्या कराव्या लागतात. परंतु आज आपल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात ही मशीन उपलब्ध झाली आहे, असे तानवडे यांनी सांगितले.
यावेळी तानवडे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. प्रारंभी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच बसवराज तानवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या मशीनची पूजा डॉ. गजानन मार्कड व माळी यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी,सरपंच बसवराज तानवडे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे, वैद्यकीय अधिकारी गजानन मार्कड, डॉ. माळी, केंद्र चालक सुरेश सोनके, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत लिपिक वसंत पाटील आदी उपस्थित होते.याप्रसंगी तानवडे यांनी तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्राला आणि उपकेंद्राला अशाच प्रकारची मशीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.