ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मैंदर्गी शहरातील दिव्यांगासाठी १ लाख ७७ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा

अक्कलकोट,दि.१७ : मैंदर्गी शहरातील २५ दिव्यांगासाठी प्रति लाभार्थी सात हजार शंभर प्रमाणे एकुण १ लाख ७७ हजार ५०० रुपये थेट बॅक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिली.

केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी दिव्यांग व्यक्तीसाठी समान संधी , संरक्षण व समान सहभाग कायदा १९९५ हा १९९६ पासून लागू केला आहे. या कायद्यातील कलम ४० अन्वये सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिव्यांग नागरिकांना दारिद्रय निर्मूलन योजनेंतर्गत पाच टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत शासन निर्णयाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत.

याबाबतचा खर्च करण्याकरता मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.मागील वर्षीपासुन कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसार व प्रादुर्भावामुळे दिव्यांग नागरिक हे अंत्यत हलाखीच्या परिस्थितीतुन जात आहेत. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिव्यांग बांधवांकडून मैंदर्गी नगरपरिषदेकडे अर्थ सहाय्य मिळण्याबाबत लेखी निवेदन प्राप्त झाले.

मैंदर्गी नगरपरिषदेकडे नगरपरिषद हद्दीतील एकुण २५ नोंदणीकृत दिव्यांग बांधव आहेत.या सर्व दिव्यांग बांधवाना प्रत्येकी  सात हजार शंभर याप्रमाणे थेट त्यांच्या राष्ट्रीकृतबॅक खात्यामध्ये जमा करण्यात आले. दिनांक १२ जुलै २०२१ रोजी मैंदर्गी नगरपरिषदेच्या सभागृहात शहरातील सर्व दिव्यांग नागरीकाचें मेळावा आयोजित करण्यात आले.

याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.दिप्ती ताई किरण केसुर , मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे सर्व सन्मानिय नगरसेवक , नगरसेविका  उपस्थित होते.हा निधी पाठविण्यासाठी कागदोपत्रे जमा करणे , बॅक अधिका-याशी संपर्क करुन सर्व दिव्यांगाचे बॅक खाते सुरु असले बाबत खात्री करणे  व इतर सर्व आवश्यक बाबीची पुर्तता करण्यासाठी सहायक प्रकल्प अधिकारी राजेंद्र गायधनकर लेखापाल अनिकेत सरडे यांनी विशेष मेहनत घेतली.

★ कोरोनाने आर्थिक घडी विस्कटलेल्या दिव्यांग बंधू , भगिनींना नगरपरिषदेमार्फत केलेल्या या आर्थिक सहाय्यचा निश्चितपणे उपयोग होईल.- श्रीकांत लाळगे, मुख्याधिकारी , मैंदर्गी नगरपरिषद.

★ नगरपरिषदेकडे  अद्याप नोंद नसणा-या शहरातील पात्र दिव्यांगांनी नगरपरिषदेकडे कागदपत्र जमा करुन तात्काळ नोंद करुन घ्यावी.- दिप्ती किरण केसुर, नगराध्यक्षा , मैंदर्गी नगरपरिषद.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!