सुशील गायकवाड यांनी व्यवस्थेतील असंख्य पैलू सजगतेने मांडले : डॉ. घोलप, राजहंस च्या ‘झेंगट’ या कादंबरीचे प्रकाशन
उत्तर सोलापूर : “कृषी महाविद्यालयातून मातीचे शिक्षण घेता घेता शिक्षण व्यवस्थेची माती कशी झाली ? याचे यथार्थ चित्रण करत तत्कालीन समाजजीवन, जगण्याच्या कक्षा आणि महत्वाचं म्हणजे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या काळातील जीवन यातील अनेक अंगावर येणारे वेधक, रंजक प्रसंग ओघवत्या कथन शैलीत ‘झेंगट’ कादंबरीत आहेत तसंच समाज व्यवस्थेतील असंख्य पैलू आहेत” असे प्रतिपादन समीक्षक प्रा. डॉ. दत्तात्रय घोलप यांनी केले. राजहंस प्रकाशनच्या सुशील रावसाहेब गायकवाड लिखित ‘ झेंगट ‘ या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराचंद नेमचंद वाचनालयाचे कार्यवाह प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर होते. ज्येष्ठ कवी माधव पवार यांच्या यांच्या हस्ते झालेल्या प्रकाशन सोहळ्यात मंचावर जेष्ठ साहित्य समीक्षक प्राध्यापक डॉ.राजशेखर शिंदे, अरुणकुमार धुमाळ, लेखक सुशील गायकवाड उपस्थित होते उपस्थित होते
घोलप पुढे म्हणाले की, ” लेखकांनी कादंबरीत चित्रित केलेला नायक हा वास्तववादी असून सुशील गायकवाड यांनी व्यवस्थेत आल्यानंतर त्यांना व्यवस्थेने दिलेले चटके व त्यांनी व्यवस्थेत केलेले बदल याचे चित्रणआगामी कादंबरीत करावे.”असे आव्हान केले.
यावेळी बोलताना प्रा. राजशेखर शिंदे यांनी झेंगट ही व्यवस्थेतील टोकदार जाणिवेची प्रतिकृती असून लेखक सनदी अधिकारी असूनही त्यांनी रेखाटलेली ही कलाकृती भविष्यात इतिहास लेखनास उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना कवी माधव पवार यांनी गायकवाड कुटुंबातील तयार झालेल्या चार लेखकांचा गौरव केला. झेंगटच्या निमित्ताने झालेले सशक्त लेखन राजहंस सारख्या मान्यवर प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहेत यातच लेखकाचं मोठं यश दडलं आहे. यावेळी लेखकानीं आपल्या भावना व्यक्त व्यक्त करताना त्यांच्यावर संस्कार केलेल्या कुटुंबाचे आणि आणि आपल्या गावाचे ऋण व्यक्त केले. आपल्या जडणघडणीच्या काळात जे जे मित्र मला भेटत गेले. सगळ्यांकडून मी जीवनानुभव शिकत गेलो. असे ते सांगत कादंबरी निर्मिती मागील आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
संदीप गायकवाड यांनी प्रथम प्रास्ताविक केले आणि त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. संयोजन समितीच्या वतीने मंचावरील मान्यवरांचे यथोचित सत्कार झाले. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कोविड पार्श्वभूमीवर निमंत्रित उपस्थितांमध्ये अभय दिवाणजी, प्रशांत जोशी, सुनील शिनखेडे, शिवराज पाटील,श्रीकांत कांबळे, अनिल शिंदे ,चेतन बाफना, अण्णासाहेब कोतली, लेखक समीर गायकवाड, उर्मिला आगरकर, गायकवाड कुटुंबीय यांच्यासह शहरातील मोजकी मान्यवर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक प्रा. संतोष पवार यांनी केले तर तर आभार दत्तात्रय शिंदे यांनी मानले.