सोलापुरात सुरू होणार दहावी, बारावीचे क्लासेस ; पालकमंत्र्यांची सूचना, कोरोना संदर्भातील नियम पाळण्याची सूचना
सोलापूर – दहावी, बारावीच्या पाल्यांचे एक्स्ट्रा क्लासेस किवा शिकवण्या सुरू ठेवण्यास हरकत नाही. पालकांनी आपापल्या पाल्यास व्यवस्थित काळजीसह क्लासेसला पाठवण्यास हरकत नाही, असे सुस्पष्ट मत नोंदवत खासगी क्लासेस व शाळा महाविद्यालयांना परवानगी देण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांना दिल्या.
कोरोना व ओमिक्रॉनच्या वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज पालकमंत्री श्री. भरणे यांची भेट घेतली. त्याप्रसंगी त्यांनी ही सूचना दिली.
कोरोना प्रतिबंधात्मक शासनाने जाहीर केलेल्या सर्व अटी, शर्तींचे तंतोतंत पालन करावे व क्लासेस सुरू करावेत, अशी पुस्तीही पालकमंत्री श्री. भरणे यांनी जोडली.
दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून दहावी व बारावीचे खासगी क्लासेस सुरू करण्याविषयी प्रोफेशनल्स टिचर्स असोसिएशनने दोन दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन दिले होते.