नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील ७२ टक्के घरांमध्ये ‘हर घर जल योजना’च्या माध्यमातून पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचविण्याचे लक्ष्य गाठण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. त्यामुळे देशभरातील जवळपास ११ कोटी महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण संपल्याचा दावा केंद्र सरकारने केला. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे डोक्यावर पाणी वाहून आणण्याचा महिलांचा त्रास कमी झाल्याचे लोकसभेतील एका पूरक प्रश्नाचे उत्तर देताना जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्पष्ट केले.
‘हर घर जल योजना’ सुरु होण्यापूर्वी देशभरात केवळ १६ टक्के घरांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचत होते. मात्र, केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे गत ४ वर्षांमध्ये ७२ टक्के घरांमध्ये शुद्ध पाणी पोहोचल्याचे शेखावत यांनी नमूद केले. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे ११ कोटी महिलांना डोक्यावरून पाणी वाहून नेण्याच्या शापापासून मुक्ती मिळाली आहे. असे असले तरी झारखंडसह आणखी काही राज्यांमध्ये या योजनेला गती देण्याची आवश्यकता शेखावत यांनी व्यक्त केली. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याच्या संकल्पासह केंद्र सरकार पाऊले टाकत आहे
माता-बहिणींना डोक्यावर पाणी वाहून नेण्याच्या शापापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. तिचे व्यापक व सकारात्मक परिणाम आज दिसत आहेत. झारखंडमधील नल-जल योजनेतील घोटाळ्यासंदर्भात भाजप खासदार संजय सेठ यांनी केलेल्या आरोपांवरदेखील यावेळी शेखावत यांनी सरकारची भूमिका मांडली. संजय सेठ जर विशेष प्रकरणाचा उल्लेख करत असतील तर सरकार त्यावर कायद्याच्या कक्षेत राहून चौकशी करेल, असे ते म्हणाले.