ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर,नारायण राणे, प्रवीण दरेकरांसह केला कोकणचा दौरा

मुंबई, 25 जुलै : कोकणात पाऊस-पुराने नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत त्यांनी आज कोकणचा दौरा केला.

या दौर्‍याचा प्रारंभ आज तळिये या गावांतून झाला. येथील नुकसानग्रस्तांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. याठिकाणी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या पुरामुळे काही मृतदेह दोन-दोन किमीपर्यंत वाहून गेले आहेत. गावांत झालेले नुकसान सुद्धा प्रचंड आहे. आज त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमचे काही लोकप्रतिनिधी तातडीने येथे पोहोचले आणि त्यांनी प्रशासन लवकर पोहोचावे, असा प्रयत्न केला. आज प्राधान्य लोकांना तातडीने मदत करण्याला असले पाहिजे आणि सोबतच पुनर्वसनाकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. एनडीआरएफसह सार्‍याच यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासन सुद्धा त्यांच्यासोबत काम करीत आहेत. या नागरिकांना केंद्र सरकारकडून सर्व ती मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे आणि एनडीआरएफचे अनुदान दोन्ही मिळावे, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. ही वेळ कुणावर आरोप करण्याची किंवा तुलना करण्याची नाही. नागरिकांना तातडीने मदत करणे आणि प्रशासनाच्या पाठिशी उभे राहण्याची वेळ आहे. भारतीय जनता पार्टी सुद्धा शक्य ती सर्व तातडीची मदत या नागरिकांपर्यंत पोहोचवित आहे.

त्यानंतर चिपळूणमध्ये सुद्धा पुराने झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. येथे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठेतील स्थिती तर भयावह आहे. काहीच शिल्लक राहिलेले नाही. या सर्वांना तातडीने मदत देण्याची गरज आहे. राज्य सरकारने त्यांना तातडीने मदत द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, या नागरिकांचे कागदपत्र सुद्धा पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे कागदपत्र नाहीत, हे गृहित धरून ही मदत करावी लागेल. कोल्हापूर-सांगलीच्या पुराच्या वेळी आपले सरकार असताना थेट रोखीने मदत देण्यात आली होती. नवीन घरे बांधून होत नाहीत, तोवर भाडे सुद्धा दिले होते. तशीच मदत आताही देण्यात यावी. तातडीच्या मदतीत निकषांचा विचार करायचा नसतो. निकषांनुसार भरीव मदत पुढच्या काळात होत राहील. अंगावर घालायला कपडे सुद्धा नागरिकांकडे नाहीत. सारेच वाहून गेले आहे. तीन ठिकाणी कम्युनिटी किचन भाजपाच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत.

वर्षभरात कोकणात ज्या घटना घडल्या आहेत, त्या पाहता थोडा वेगळा विचार येणार्‍या काळात करावा लागेल. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने नव्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील आणि यादृष्टीने ‘रोडमॅप’ तयार करण्याची नितांत गरज आहे. अलमट्टीचा विसर्ग सुरू होतो, तेव्हा कर्नाटकात पूर येतो. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच अतिरिक्त विसर्ग केला तर बरे होईल, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली आहे. थोडे धाडस करावे लागेल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!