राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमात तक्रारींचा पाऊस ! कुठे आश्वासन, कुठे थेट अधिकाऱ्यांना फोन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मारुती बावडे
अक्कलकोट : राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमाला सलग दुसऱ्या दिवशी अक्कलकोट तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या जनता दरबार कार्यक्रमात तालुक्यातील नागरिकांनी अक्षर:शा तक्रारींचा पाऊस पडला आणि प्रशासनातील अकार्यक्षम अधिकारी आणि व्यवस्थेचा पाढा वाचला.
या सगळ्या परिस्थितीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाटील यांनी काहींना आश्वासन तर काहींना थेट अधिकाऱ्यांना फोन लावून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या या अनोख्या जनता दरबार कार्यक्रमाने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. राष्ट्रवादी ने पहिल्यांदाच तालुक्यात असा उपक्रम राबविला होता. पहिल्या दिवशीच्या जनता दरबार कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही चप्पळगाव येथून सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास चपळगावचे सरपंच उमेश पाटील, बसवराज बाणेगाव, महादेव वाले यांची विशेष उपस्थिती होती.येथेही नागरिकांनी निवेदने दिली. या निवेदनाचा स्वीकार करून काही निवेदनाच्या प्रती थेट अधिकाऱ्यांना फोन लावून काम करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला. यानंतर वागदरी येथे परमेश्वर मंदिरात जनता दरबार भरविण्यात आला होता. यावेळी गोगाव, शिरवळ, शिरवळ वाडी, पालापुर या भागातील नागरिकांनी हजेरी लावून आपल्या भागातील प्रश्न निवेदनाद्वारे सादर केले. यात अनेक गावाचे सरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना कार्यकारी जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या या संकल्पनेबाबत माहिती दिली. आणि केवळ आम्ही निवेदन स्वीकारणार नाही तर नागरिकांचे कामे प्रत्यक्ष करणार आहोत. नागरिकांची कामे होत नसेल तर प्रशासनाचे काय काम आहे. यात सरकारचा काही दोष नसतो ज्या कामासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे तो अधिकारी जर नीट काम करत नसेल तर सरकार बदनाम होते त्यामुळे ही व्यवस्था सरळ करण्यासाठी अशा जनता दरबार कार्यक्रमाची गरज आहे आणि ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करून प्रश्नांची सोडवणूक करून त्यांना खर्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देणार आहोत, असेही पाटील यावेळी म्हणाले.
आज चपळगाव, वागदरी पाठोपाठ नागणसूर, जेऊर आणि मंगरूळ येथेही जनता दरबार भरविण्यात आला होता. यावेळी तिथल्या परिसरातील जनतेने वैयक्तिक प्रश्नांसह सार्वजनिक प्रश्नही या कार्यक्रमामध्ये मांडले. काहींनी रस्त्या संदर्भात, काहींनी जमिनीच्या संदर्भात, काहींनी सभागृहाच्या संदर्भात, काहींनी विजेच्या संदर्भात असे विविध प्रश्न निवेदनाद्वारे मांडून या जनता दरबारामध्ये अक्षर:शा तक्रारींचा पाऊस पाडत समस्यांचा पाढा वाचला. तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे म्हणाले की, या जनता दरबार कार्यक्रमातून तालुक्यात निश्चित बदल दिसेल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्षम आणि धाडसी नेतृत्व आहे. त्यांच्या कामाची पद्धत खूप वेगळी आहे आणि त्यांच्यापर्यंत थेट निवेदन पोहोचणार असल्याने कामे निश्चित मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते लतीफभाई तांबोळी म्हणाले की, ज्यावेळी अधिकारी काम करत नाहीत त्यावेळी पक्ष किंवा सरकार बदनाम होतो आणि खऱ्या अर्थाने याच प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादीने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. याचे सकारात्मक चित्र आपल्याला लवकरच पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष मनोज निकम, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, शिवराज स्वामी, शंकर व्हनमाने, स्वामीनाथ चौगुले, सुनंदा राजेगावकर, माया जाधव, अविराज सिद्धे, यतीराज सिद्धे, योगीराज सिद्धे,बंटी पाटील, मीरा बुद्रुक, विक्रांत पिसे, आकाश शिंदे, श्रीशैल चितली, आकाश कलशेट्टी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच उमेश पाटील यांना राष्ट्रवादीचे निमंत्रण ?
चपळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांचे स्वागत केले आणि सत्कार केला.भाषणावेळी उमेश पाटील यांनी सरपंच पाटील यांना उद्देशून आपण काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,कधीही आमच्याकडे या,असा
सल्ला देत त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्यास सल्ला दिला की काय अशी चर्चा कार्यक्रम ठिकाणी रंगली होती.