ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जनता दरबारमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाले ‘बळ’,आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची तयारी

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगानेच तालुक्यात राष्ट्रवादीने जनता दरबारचा नारळ अक्कलकोटमधूनच फोडल्याचे बोलले जात आहे. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले असून कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अक्कलकोट तालुका हा टेल अँड मानला जातो. याठिकाणी राष्ट्रवादीची ताकत पुर्वीपासून थोडी कमी आहे.  असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी यात लक्ष घालत जनता दरबारची सुरुवात अक्कलकोटमधून केली आहे.

विशेष म्हणजे उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या उदघाटन कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्यासह कल्याणराव काळे, उत्तमराव जानकर, भारत जाधव आदी नेत्यांची हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला गेला. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम, कार्याध्यक्ष माणिक बिराजदार, शिवराज स्वामी, शंकर व्हनमाने, मोतीराम चव्हाण, बंदेनवाज कोरबू, विक्रांत पिसे, माया जाधव, सुनंदा राजेगावकर, इस्माईल फुलारी आदी नेते मंडळीनी केले होते.

या जनता दरबार कार्यक्रमांमधून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न मांडले. यात कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी देखील कार्यक्रमाचे फलित जनतेला मिळावे म्हणून काही अधिकाऱ्यांना जागेवरून थेट फोन लावून तर काहीचे अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला .काही प्रश्न जागेवर निकाली निघाले.यावरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष कामाचा आहे अशा प्रकारचा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीने तालुक्यात अशा प्रकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम कधी घेतला नव्हता. या कार्यक्रमाने तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्षाचे महा विकास आघाडी सरकार आहे. सत्तेत असताना देखील नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने सुरू केला आहे आणि त्याची सुरुवात अक्कलकोटमधून करण्यात आलेली आहे. ही बाब कार्यकर्त्यांना व नेत्यांना निश्चित बळ देणारी ठरणार आहे.

कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील आणि जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्यात जरी काही प्रमाणात मतभेद असले तरी या कार्यक्रमात मात्र ते दोघेही एकाच व्यासपीठावर दिसले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधील ‘एकी ‘या निमित्ताने दिसून आली. तशी चर्चा कार्यक्रमात ऐकायला मिळाली. चपळगाव, वागदरी, मंगरूळ,  नागणसूर, दुधनी, मैंदर्गी आदी ठिकाणी राष्ट्रवादीने दोन दिवसात जनता दरबारच्या माध्यमातून केलेला झंझावती दौरा हा कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करून गेला आहे. याचा फायदा आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शहराध्यक्ष मनोज निकम यांच्यासारखे हरहुन्नरी नेते राष्ट्रवादीला मिळाले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने पक्ष वाढत चालला आहे. या दौऱ्याने अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यास इच्छुक झालेले आहेत. सध्या तालुक्यात राष्ट्रवादीचे बळ कमी असले तरी या दौर्‍याने तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढण्याबरोबरच चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जर अशाच प्रकारे पक्षाला वरिष्ठ पातळीवरून बळ मिळाले तर तालुक्यात राष्ट्रवादी वाढल्याशिवाय राहणार नाही, असे कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!