बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू, आमदार कल्याणशेट्टी यांनी घेतली केंद्रीय मंत्री शिंदे यांची भेट
अक्कलकोट ,दि.१३ : बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यासंदर्भात त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावेळी त्यांनी विमानतळाच्या प्रलंबित
प्रश्नाविषयी सविस्तर चर्चा केली.
सोलापूर जिल्ह्यासाठी सध्या बोरामणी गावातील नवीन ग्रीन फील्ड विमानतळाचा विकास जलदगतीने होणे आवश्यक आहे. आमदार कल्याणशेट्टी यांनी शिंदे यांना बोरामणी विमानतळाची सध्या सुरू असलेल्या कामांची स्थिती आणि आणखी कोणती कामे अपेक्षित आहेत. तसेच हे विमानतळ पूर्ण झाल्यानंतर सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांना होणारा लाभ याचीही माहिती दिली.
बोरामणी येथील नवीन विमानतळासाठी आवश्यक जमीन महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने संपादीत करण्यात आलेली आहे. त्यात ४९ टक्के वाटा महाराष्ट्र सरकारचा तर ५१ टक्के भारत सरकारचा आहे जो अद्याप अंतिम झालेला नाही. या योजनेस अंतिम स्वरूप देण्याची बाब प्रलंबित आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन आणि उर्वरित प्रक्रिया जलद करण्यासंबंधी लक्ष घालावे, अशी विनंती केली असल्याचे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
सध्या सोलापूरच्या नागरिकांना विमान प्रवास करण्यासाठी कलबुर्गी, पुणे, मुंबई व हैदराबाद या ठिकाणी जावे लागत आहे. शेजारच्या कलबुर्गीहून बंगळूर, तिरुपती बालाजी आदींसह अनेक ठिकाणी सेवा मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरला विमान सेवेची गरज आहे. ही बाब त्यांना पटवून दिली आहे. सोलापूर खासकरून अक्कलकोट तालुक्याशी माझे ऋणानुबंध आहेत. यामुळे मी विमातळाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करेन, अशी ग्वाही शिंदे यांनी या भेटीत दिली. पुढील काळात विमानतळासंदर्भाने मी सतत पाठपुरावा करणार असल्याचे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.