नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येत्या १९ रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून निवडणुकीला 8 दिवस बाकी आहेत, त्याआधी भाजपने उमेदवारांची ११ वी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेशातील एकाच उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील जागांचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची ११ वी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील भदोही लोकसभा मतदारसंघातून डॉ. विनोद कुमार बिंद यांना तिकीट दिले आहे. भाजपने आतापर्यंत उत्तर प्रदेशातील 71 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
कैसरगंज, रायबरेली, देवरिया आणि फिरोजाबाद लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. कैसरगंजमध्ये विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. काल भाजपने 10वी यादी तयार केली होती. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील 7 जागांसाठी उमेदवार तर पश्चिम बंगाल आणि चंदीगडमधील प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली होती.
भारतीय जनता पक्षाच्या ११ व्या यादीमध्येही महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघाचा समावेश नाही. भाजपकडून साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसलेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तसेच रत्नागिरीमध्ये नारायण राणेंच्या नावाची चर्चा आहे.मात्र अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने सस्पेन्स कायम आहे.