ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमधील सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार, देखभाल व दुरुस्तीचा खर्च नगरपालिका उचलणार

अक्कलकोट  : नूतन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि मुख्याधिकारी सचिन पाटील  यांच्या  सहकार्यातून अक्कलकोट मधील सीसीटीव्ही कॅमेरे गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार आहेत. याबाबतचा निर्णय आज अक्कलकोट नगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केलेल्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांची मुख्याधिकारी पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये जे जुने बील आहे ते काढण्याचा निर्णय झाला आणि यापुढील देखभाल आणि दुरुस्ती याचा सर्व खर्च नगरपालिका करणार असल्याचे सांगण्यात आले.

यात नगरपालिकेला एक मोठा डिस्प्ले आणि अक्कलकोट शहरातील संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेराचा आऊटपुट देण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावरील सर्व नियंत्रण मात्र अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्येच राहणार आहे. अक्कलकोट शहरात विविध चौकांमध्ये ४८ कॅमेरा लावण्यात आले होते. यातील काही कॅमेरे सुस्थितीत आहेत तर काही कॅमेरे दुरुस्ती अभावी बंद आहेत.
आता हे तातडीने सुरू करण्यासाठी ४० ते ४५ हजार रुपयाची गरज आहे.ते लोकसहभागातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढचा खर्च मात्र नगरपालिका उचलणार आहे.

चार वर्षापूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी मोठ्या प्रयत्नातून व त्यांच्या विशेष पुढाकारातून अक्कलकोट शहरांमध्ये सर्व चौकांमध्ये ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. यावर हजारो रुपये खर्च झाले होते. याची चर्चा राज्यभर झाली होती आणि हा पॅटर्न सर्वत्र लागू करण्याचाही निर्णय झाला होता. त्यानंतर दुर्लक्षामुळे हे कॅमेरे धूळखात पडले होते.

याबाबतची चर्चा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासमोर पत्रकारांनी केल्यानंतर त्यांनी तातडीने ही यंत्रणा पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नूतन पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावला आहे. या बैठकीला मायक्रोस्टार कॉम्प्युटरचे इब्राहिम कारंजे, मलिक बागवान व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

◆ तातडीने अंमलबजावणी करू

यापुढील देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च
जो आहे तो नगरपालिका उचलणार आहे. याची स्वच्छ सर्वेक्षण व अन्य कामांमध्ये ही नगरपालिकेला चांगली मदत होणार आहे. तसा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. याची तातडीने अंमलबजावणी करू – सचिन पाटील ,मुख्याधिकारी

 

◆ तपास कामात मदत होईल

तत्कालीन पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी चांगला उपक्रम राबवला होता.तो उपक्रम आम्ही पुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा आणखी सक्षम करणार आहोत.या यंत्रणेचा फायदा तपास कामांमध्ये होणार आहे – अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!