ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी अक्कलकोटमध्ये शंखनाद आंदोलन, मंदिरे बंद ठेवता मग दारू दुकाने का सुरू ठेवता, आमदार कल्याणशेट्टी यांचा सवाल

अक्कलकोट  : राज्यात कोरोना कमी झालेला असताना मंदिरे बंद ठेवता मग दारू दुकाने का सुरू ठेवता असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी मंदिरे बंद,  उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार!  अशा प्रकारची घोषणा करून मंदिर परिसर दणाणून सोडला. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज श्री स्वामी समर्थ मंदिरा जवळ शंखनाद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हे आंदोलन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

ज्यावेळी राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होता. त्यावेळी सर्वांनी सरकारला सहकार्य केले. आता मात्र कोरोना कमी झालेला असताना त्याच्या नावाखाली मंदिरे बंद ठेवणे चुकीचे आहे. लोकांच्या भावना त्यात गुंतल्या आहेत. विशेष म्हणजे या मंदिरावरती अनेकांचे जीवनमान व गुजराण अवलंबून आहे. मंदिरे बंद असल्याने गरिबांचे हाल होत आहेत. त्यावर अवलंबून असलेल्यांची उपासमार होत आहे. याचा विचार सरकारने केला पाहिजे. हे सगळे एकीकडे असताना दुसरीकडे दारू दुकाने मात्र उघडे ठेवायचे, डान्सबार, अवैध धंदे दिवस-रात्र सुरू ठेवायचे हा कुठला न्याय आहे. सरकारचे निर्णय दुटप्पी आहेत त्याचा आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करत आहोत. आता कोरोना कमी झाल्याने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे त्वरित उघडावीत अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी मंदिरे बंद ,गरिबांचे हाल , तर ठाकरे सरकार मालामाल , भक्तोंको जेल , मंदिरोंको ताला , उद्धव सरकार में शराब का बोलबाला, मंदिरे बंद , उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार असा नारा देत विविध प्रकारचे भजन गात शंखनाद आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले.

यावेळी जेष्ठ नगरसेवक महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी,  प्रभाकर मजगे, परमेश्वर यादवाड, अंबण्णा चौगुले,  ऋषी लोणारी,अंकुश चौगुले, अतिष पवार, आनंद पवार, संजय राठोड, कांतू धनशेट्टी, रमेश कापसे, नन्हू कोरबू, सागर डिग्गे, स्वामीनाथ घोडके, नागराज कुंभार, बाळा शिंदे, बबलू कामनूरकर, विनोद मोरे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!