अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातही कोरोना संसर्गाची साखळी वाढत चालली आहे.सध्या तालुक्यात १२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.यामध्ये शहरातील ४५ आणि ग्रामीण मधील ७९ रुग्णांचा समावेश आहे. कोविड सुरू झाल्यापासून आतापर्यंत ७८ जणांचा बळी गेल्याची माहिती तालुका वैद्यकीय यंत्रणेने दिली आहे.
कोरोना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत १ हजार ६१७ रूग्ण आढळले आहेत.त्यामध्ये ग्रामीणमध्ये १ हजार १४३ आणि अक्कलकोट शहरात ४७४ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १ हजार ४१५ रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. बळी गेलेल्या ७८ जणांमध्ये ग्रामीण मधील ५२ आणि शहरांमध्ये २६ जणांचा समावेश आहे.
सध्या ऍक्टिव्ह १२४ रुग्ण आहेत. त्यात सीसीसी सेंटरमध्ये ७७, होम आयसोलेशन मध्ये ७ आणि विविध हॉस्पिटलमध्ये ४० जण उपचार घेत आहेत.यात ग्रामीणचा आकडा रोज वाढत चालला आहे.
शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तरी शहर आणि तालुक्यात अजून म्हणावे तसे टेस्टिंगला लोक प्रतिसाद देत नाहीत.ते वाढवल्यास आणखी रुग्णांमध्ये वाढू शकते, अनेक जण अंगावर काढत आहेत. ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे असतील,त्यांनी तात्काळ वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधून कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि उपचार करून घ्यावेत, असे आवाहन तालुका आरोग्य यंत्रणेने केले आहे.