दुधनी : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे विविध क्षेत्राला फटका बसलेला असतानाच त्याचा फटका आता स्वच्छ भारत अभियानालाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामीण भागातील सर्व गावे २०२२ पर्यंत शंभरटक्के हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाचा संकल्प केला आहे. त्या संकल्पनेला ग्रामिण भागात प्रत्यक्षात अल्प प्रतिसाद मिळत आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी तांब्या घेवुन बाहेर जणार्यांच्या संख्येत काही कमी झाली नाही. काहीगावे तर केवळ कागदावरच हागणदारी मुक्त झाले आहेत.
दुधनी शहरात प्रवेश करतानाच या अभियानाचा फज्जा उडालेला दिसतो. कारण शहरात प्रवेश होणाऱ्या सर्वच रस्त्यावर दुतर्फा पहाटे आणि रात्री उघड्यावर मोठया प्रमाणात शौचाला बसतात. त्यामुळे दुर्गंधीत वाढ होत आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा खर्च करून घरोघरी शौचालये बांधण्यात आली आहेत; मात्र त्यांचा वापरच होताना दिसत नाही.
दुधनी शहर आणि पंचक्रोशितील अनेक गावांमध्ये शौचालयाचा वापर लाकुड, गवर्या आणि इतर इंधन ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी शाैचालयांना कुलूप लावण्यात आले आहे. शाैचालयांना पाणी जास्त लागते अशी मानसिकता ग्रामिण भागातील नागरिकांचा आहे. ग्रामीण भागात कायम पाणीटंचाई असते. त्यामुळेही शाैचालयांचा वापर होत नसल्याचे चित्र आहे.
दुधनी शहरातील स्टेशन रोड, दुधनी-गाणगापूर रोड, दुधनी-अक्कलकोट रोड आणि इतर मार्गावर काही बेजबाबदार नागरिक बिनधास्त उघड्यावर शौचास बसतात. यामुळे पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या पुरुषांना आणि महिलांना शरमेने मान खाली घालुन जावे लागते. काही वर्षांपूर्वी उघड्यावर शौचास बसणाऱ्यावर आळा घालण्यासाठी नगरपरिषद मार्फत गुड मॉर्निंग पथक गठीत करण्यात आली होती.
गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास बसणार्यावर कहीवेळा दंडात्मक कारावाई देखील केली. दुधनी शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी मनोज देसाई यांनी एक पाऊल पुढे जावून उघड्यावर शौचास बसाणार्यांचे छायाचित्रे काढुन शहरातील मुख्य चौकात लावला. यामुळे काही काळ उघड्यावर शौचास बसणं बंद झालं होतं. मात्र सद्या गुड मॉर्निंग पथका मार्फत कुठेही कारवाई होताना दिसत नाही.
देशात कोरोना साथीचा विळखा दिवसेंदिवस आणखीन घट्ट होत असल्याने नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे कोरोना चाचणी, कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग, कंटेंनमेंट झोन तसेच मास्कची सक्ती करणे हे काम देण्यात आली आहे.
नगर परिषद कर्मचाऱ्यांवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जवाबदारी देण्यात आले आहे. हे काम दिवसभरात दहा ते बारा तास चालत. हे काम करत असल्याने स्वच्छ भारत अभियानाकडे दुर्लक्ष होत आहे.
शहरात उघड्यावर शौचास बसण्यामुळे डासांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे शहरातील सर्व खासगी दवाखान्यांमध्ये गर्दी पहायला मिळत आहे. सर्दी, ताप, खोकला, घशात खव-खवणे आणि जुन्या आजारांनी डोके वर काढले आहेत. यामुळे खासगी दवाखान्यामध्ये गर्दी दिसून येत आहे.