ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात २५६ सार्वजनिक तर १० हजार ७६० घरगुती गणपतीचे शांततेत विसर्जन, प्रशासनाच्या नियमांचे उत्सवावर सावट

मारुती बावडे

अक्कलकोट : यंदा कोरोनामुळे अक्कलकोट शहर आणि तालुक्यात श्री
गणेश विसर्जनात मिरवणूक कुठेही
दिसली नाही. उत्साह मात्र मंडळाने
कायम ठेवत हा उत्सव साधेपणाने साजरा केला आणि प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत  ‘गणपती
बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’
असा गजर करत श्री गणरायाला निरोप दिला.

यंदाच्या गणेशोत्सवावर पूर्णपणे प्रशासनाच्या नियमांचे सावट दिसून आले . अक्कलकोट नगरपालिकेने मूर्तीदानाची संकल्पना राबवली होती.त्यालाही शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला.

अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण व उत्तर या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २५६ सार्वजनिक तर १० हजार ७६० घरगुती गणपतीचे विसर्जन शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता बहुतांश ठिकाणी जागेवरच श्रीचे विसर्जन करण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.दुधनी, नागणसुर, जेऊर, तडवळ, मुगळी, नागुरे, बबलाद, मंगरूळ, शावळ, आळगे, कोर्सेगाव ही संवेदनशील गावे आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध ठिकाणी बैठका घेऊन शासनाकडून आलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल,असा इशारा दिला होता.त्यामुळे १४२ सार्वजनिक तर १ हजार ५६० गणेश मंडळानी कोणत्याही प्रकारे गोंधळ न करता जागेवर विसर्जन करून तालुक्यात एक प्रकारचा नवीन पायंडा पाडला.

संपूर्ण तालुक्यात कोणत्याही गावात अनुचित प्रकार घडला नाही,असे सांगण्यात आले. उत्तर भागात चपळगाव, चुंगी, सलगर, शिरवळ, वागदरी, गोगाव, घोळसगाव, कर्जाळ, चिक्केहळळी ही गावे संवेदनशील आहेत.या हद्दीमध्ये ११४ सार्वजनिक तर ९ हजार २०० घरगुती गणपतीचे विसर्जन कार्येकर्त्यांनी मिरवणूक न काढता जागेवर विसर्जन केले.

यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, दक्षिण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, उत्तरचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलिस उप निरीक्षक बजरंग बाडीवाले, छबू बेरड, सपोनि महेश भावीकट्टी, सपोनि देवेंद्र राठोड, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्यासह पोलीस अधिकारी ,कर्मचारी व होमगार्ड यांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला
होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!