ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर -अक्कलकोट रस्त्यावर टोल वसुली विरोधात आंदोलन, काँग्रेस व प्रहार आक्रमक,अडीच तास टोल बंद पाडून वेधले लक्ष

अक्कलकोट,दि.२२ : अक्कलकोट ते सोलापूर रस्त्याचे काम अर्धवट असताना प्रशासनाने सुरू केलेल्या टोलवसुलीच्या विरोधात बुधवारी काँग्रेस आणि प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आणि  चक्क टोल बंद पाडत हे आंदोलन केले.याबाबत प्रशासनाने भूमिका बदलावी आणि काम पुर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये,अशी मागणी करत प्रशासनाला टार्गेट केले.यासाठी आठ दिवसाची मुदत घ्या तरीही जर ही भूमिका राहिली तर मात्र यापेक्षाही उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिला.

गेल्या दोन दिवसापासून अक्कलकोट शहर आणि तालुका तसेच वळसंग परिसर व सोलापूरला येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांमध्ये या टोल वसुलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व प्रहार संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.त्या अनुषंगाने आज सकाळी ११ वाजता माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के – पाटील, दक्षिणचे तालुकाध्यक्ष मोहसिन तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

तब्बल अडीच तास हे आंदोलन चालले. आंदोलनावेळी कुणाचाही टोल घेऊ दिला नाही. अधिग्रहित झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना त्वरित द्यावा, रस्त्याचे काम करत असताना ज्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांना किमान १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, वळसंग परिसरातील स्थानिकांना टोल नाक्यावर कामाला घ्यावे, तसेच टोलनाक्यापासून पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेल्या वीस किलोमीटर परिसरातील गावांना टोल फ्री असावा तसेच जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलाला कामासाठी प्राधान्य द्यावे या व अन्य प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. याचे निवेदनही राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि दक्षिण सोलापूरच्या प्रशासनाला देण्यात आले.

अक्कलकोट सोलापूर रस्त्याचे काम ७० ते ८० टक्के पूर्ण झाले आहे. अजून बरेच काम बाकी आहे असे असताना टोल वसुली करणे अत्यंत गैर आहे. प्रशासनाची ही मनमानी आहे. आठ दिवसाची आम्ही त्यांना मुदत देत आहोत तोपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही टोल वसुली थांबवावी. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये, अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही १ ऑक्टोबर पासून पुन्हा यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आंदोलनावेळी दिला.

प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मोहसीन तांबोळी यांनीही प्रशासनाच्या या मनमानी निर्णयावर कडाडून टीका केली आणि हा निर्णय हाणून पडल्याशिवाय स्वस्थ बसणार
नाही,असा इशारा दिला. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांनी जोपर्यंत हा टोल बंद होत नाही तोपर्यंत प्रहार आक्रमक भूमिका घेत राहील, असे स्पष्ट केले.

या आंदोलनाला अखिल भारतीय वीरशैव महासभेने देखील पाठिंबा दिला. त्यानंतर वळसंगमधील नागरिकांसाठी टोल माफी देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर बाकीच्या इतर मागण्यांबाबत मात्र आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या आंदोलनामध्ये दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे,शाकिर पटेल, प्रहार संघटनेचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, वळसंगचे सरपंच श्रीशैल दुधगी, माजी सरपंच महादेव होटकर, डॉ. राजेंद्रप्रसाद पंडित, सिद्धाराम कोडले, खंडू शिंदे ,दिनकर नारायणकर, अमर शिरसाट, फारुख शेख, सायबु गायकवाड, अल्ताफ पटेल, वीरेश बागलकोट मल्लिनाथ ढब्बे, विश्वनाथ हडलगी आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील टोल वसुलीसुद्धा गुंड प्रवृत्तीचे लोक ठेवण्यात आलेले आहेत हे बरोबर नाही.
यात बदल करणे गरजेचे आहे अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल नाही ,
ही आमची स्पष्ट भूमिका आहे – सिद्धाराम म्हेत्रे,माजी मंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!