---Advertisement---

ऊसतोड कामगार बांधवांची नोंद पारदर्शक पद्धतीने व्हावी – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कुठल्याही दस्तऐवजात ‘ऊसतोड कामगार’ अशी नोंदणी नसलेल्या लाखो असंघटित ऊसतोड कामगारांच्या जीवनाशी निगडित, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

नोंदणी यावर्षीच्या सिझनला कामगार स्थलांतरीत होण्यापूर्वीच केली जावी; नोंदणी करताना स्थानिक राजकारण, गाव स्तरावरील गटबाजी किंवा पक्षपात अशा कोणत्याही बाबीचा परिणाम नोंदणीवर न होऊ देता पारदर्शक पद्धतीने सरसकट ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे, अशा स्पष्ट सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत.

पिढ्यानपिढ्या उसाच्या बुडावर कोयत्याने घाव घालून अनेक हाल-अपेष्टा सोसलेल्या ऊसतोड कामगारांच्या हातांनी स्वतःची व आपल्या मुला-बाळांची उपेक्षा सहन करत आपल्याला साखर दिली. आता या कष्टकरी हातांच्या ऋणातून उतराई होण्याची आपली वेळ आहे, त्यासाठी कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची पारदर्शक पद्धतीने नोंदणी होणे हा अत्यंत महत्वाचा टप्पा असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. जिल्हा स्तरावरून यासंबंधीचे अनुषंगिक आदेश ग्रामसेवकांना देण्यात यावेत व निर्धारित वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशा सूचनाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत.

ऊसतोड कामगारांचे नाव, आधार कार्ड, फोटो, बँक खाते, रेशन कार्ड यांसारख्या काही कागदपत्रांची या नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यकता भासणार आहे. तसेच ज्या ऊसतोड कामगारांनी अलीकडच्या काळात उसतोडणीचे काम बंद केले मात्र पूर्वी ते ऊसतोडणी करत होते, अशा कामगारांचीही नोंदणी याद्वारे करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय व सोबतच नोंदणी करावयाचा नमुना फॉर्म व ओळखपत्राचा नमुनादेखील निर्गमित करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात ग्रामसेवकामार्फत ही नोंदणी पूर्ण केली जाणार आहे.

महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना, आरोग्य विमा या व यांसारख्या अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगार नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. यासाठी संकलित केलेली माहिती संपूर्ण संगणकीकृत करून एका अॅपद्वारे नोंदणी व ओळखपत्र प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार बांधवांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत ग्रामसेवकांकडे जमा करून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!