मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हालचाली सुरू केल्या असून, महापालिकांमधील पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. उपमहापौर आणि गटनेत्यांच्या कामाचेही ऑडिट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकांमध्ये ‘भाकरी फिरवून’ पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांची बैठक बोलावली असून, या बैठकीत त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. तसेच नगरसेवकांच्या अडचणी जाणून घेऊन पक्षाची धोरणे प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
उपमहापौर आणि गटनेत्यांच्या कामाचे ऑडिट
महापालिकेतील उपमहापौर आणि गटनेत्यांच्या कामगिरीचाही आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः महापालिकेतील टेंडर प्रक्रिया, विकासकामे आणि लोकाभिमुख उपक्रमांमध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका तपासली जाणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
नगराध्यक्षांचीही आज महत्त्वाची बैठक
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील शिवसेनेच्या सर्व नगराध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी ही बैठक होणार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे नगराध्यक्षांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पाणीटंचाईचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. याशिवाय नगराध्यक्षांना येणाऱ्या अडचणी, प्रभागातील विकासकामे, महायुतीतील मतभेद, स्थानिक पातळीवरील वाद आणि पक्षवाढीच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे महापालिकांमधील पदाधिकाऱ्यांचा आढावा आणि नगराध्यक्षांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत नेमके कोणते बदल करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










