---Advertisement---

पदाचा गैरवापर केला’; राहुल नार्वेकरांविरोधात संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आदिवासींच्या जमिनी खरेदी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अलिबागमधील म्हात्रोळे गावात आदिवासींच्या जमिनी आणि घरांची खरेदी करण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला असून, या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यपालांची परवानगी घेऊन विधानसभा अध्यक्षांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

संजय राऊत यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे. राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर असून, त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप राऊत यांनी केला. पोलीस, महसूल आणि नगरविकास यंत्रणांवर दबाव आणल्याचा दावाही त्यांनी केला. अलिबागमधील म्हात्रोळे गावात सुमारे २० आदिवासींच्या जमिनी आणि घरांची खरेदी करण्यात आली असून, हे प्रकरण जवळपास १५ एकर जमिनीशी संबंधित असल्याचे राऊत यांनी सांगितले.

आदिवासींच्या जमिनी खरेदी करण्यास कायदेशीर मर्यादा असताना हा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित जमिनींवर सरकारी योजनेतून बांधण्यात आलेली घरेही होती. जमीन खरेदी केल्यानंतर आदिवासींच्या घरांवर जेसीबी चालवून ती पाडण्यात आली. दशरथ पाटील नावाच्या एजंटमार्फत घरांची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. आदिवासी कुटुंबांना कोणतीही भरपाई न देता त्यांना विस्थापित करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.

या प्रकरणात स्थानिक आदिवासी काही दिवसांपासून आंदोलन करत असून, उल्का महाजन यांचाही आंदोलनात सहभाग असल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र, संबंधित यंत्रणा आदिवासींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!