सोलापूर वृत्तसंस्था – देवदर्शनासाठी हसत-खेळत घरातून बाहेर पडलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारंबे कुटुंबीय अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी सोमवारी सकाळी कल्याण येथून कारने निघाले होते. मात्र, सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते तेलंगवाडी गावादरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कार आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.
या अपघातात पार्थ तुषार भारंबे (वय ८), विलास चांगु भारंबे (वय ६६) आणि शोभा विलास भारंबे (वय ६३) यांचा मृत्यू झाला आहे. तर तुषार विलास भारंबे आणि पूनम तुषार भारंबे हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाचा प्रवास अशा प्रकारे मृत्यूच्या दारात संपल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. एका चिमुकल्यासह तिघांच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकमध्येही खड्ड्याने घेतला एकाचा जीव
दुसरीकडे, नाशिकमध्ये रस्त्यावरील खोल खड्ड्यामुळे एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. या घटनेत पंकज प्रकाश ठाकरे याचा मृत्यू झाला असून ओंकार भुसार हा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे रस्ते कामांदरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.











