सांगली वृत्तसंस्था : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी माहेरी आलेल्या ३० वर्षीय विवाहित महिलेची तिच्याच प्रियकराने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. आईसमोरच हा प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जत तालुक्यातील कंठी गावाजवळ असलेल्या मोटेवाडी येथील खरात वस्तीवर ही घटना घडली. राजाक्का काशीराम खरात (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या उच्चशिक्षित आणि विवाहित होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, राजाक्का आणि संशयित आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, राजाक्का फोन उचलत नसल्याने तसेच गावाकडे येऊनही भेटण्यास नकार दिल्याने आरोपीच्या मनात राग आणि संशय निर्माण झाला होता. याच रागातून आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले.
या हल्ल्यात राजाक्का यांचा मृत्यू झाला. आईसमोरच मुलीची हत्या झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.










