मुंबई वृत्तसंस्था : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कीर्तनादरम्यान त्यांनी मुलींच्या प्रेमाबाबत केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘मुलगी कधीच मुलावर प्रेम करत नाही, ती पैशांवर प्रेम करते,’ असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून सामाजिक विषयांवर भाष्य करत असतात. मात्र, अनेकदा त्यांच्या विधानांमुळे वाद निर्माण होतो. यावेळी त्यांनी प्रेम आणि मुला-मुलींच्या नात्यांवर भाष्य करताना मुलींच्या प्रेमाबाबत मिश्किल टिप्पणी केली.
कीर्तनादरम्यान बोलताना ते म्हणाले की, ‘असे म्हणतात की ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. पण पोरगी कधीच मुलावर प्रेम करत नाही, ती पैशांवर प्रेम करते. खरं आहे की खोटं आहे, तुम्हाला आलेला अनुभव आहे.’ यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांकडे पाहत प्रेमात मिळालेल्या अनुभवांवरही विनोदी शैलीत भाष्य केले.
लव्ह इज अ मनी, मनी इज अ लव्ह’
प्रेमाची स्वतःची व्याख्या सांगताना इंदुरीकर महाराज म्हणाले, ‘लव्ह इज अ मनी आणि मनी इज अ लव्ह. मनी इज लाइफ आणि लाइफ इज अ मनी.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रेम, पैसा आणि नातेसंबंध यावरून सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे.
मोबाईलच्या अतिवापराबाबतही दिला सल्ला
याच कीर्तनात त्यांनी मोबाईलच्या वाढत्या वापराबाबतही चिंता व्यक्त केली. मोबाईलमुळे लोक वेडी झाली आहेत, असे म्हणत मोबाईल सतत उघडा ठेवू नका, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला.
सरकारी मदतीचे कौतुक; शाळा वाचवण्याचे आवाहन
दरम्यान, सरकारकडून मिळालेल्या पाच हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या दोन हजार रुपयांच्या मदतीमुळे यंदा सर्वांची दिवाळी मोठी झाली, असे म्हणत त्यांनी सरकारी मदतीचे कौतुक केले. तसेच जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळा टिकल्या पाहिजेत, अन्यथा सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
एकीकडे मुलींच्या प्रेमाबाबत केलेले विधान चर्चेचा विषय ठरत असताना दुसरीकडे मोबाईलचा वापर, सरकारी मदत आणि सरकारी शाळांचे महत्त्व यावर केलेल्या भाष्याचीही चर्चा होत आहे.










