दोहा वृत्तसंस्था : एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. पाकिस्तान अ संघाने भारत अ संघाचा 48 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार तिलक वर्माने फलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. विशेषतः मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी भागीदारी करण्यात अपयश आल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रविवारी भारत-पाकिस्तान यांच्यात हा सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 314 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 42 चेंडूंत 70 धावा ठोकल्या. मात्र, त्यानंतर भारतीय फलंदाजी ढेपाळली. 129 धावांवर भारताने सहा विकेट गमावल्या होत्या.
अशा कठीण परिस्थितीत कर्णधार तिलक वर्मा आणि शाहबाज अहमद यांनी डाव सावरला. दोघांनी सातव्या विकेटसाठी 112 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शाहबाजने 41 चेंडूंत 56 धावा केल्या, तर तिलक वर्माने 149 चेंडूंत नाबाद 100 धावांची खेळी केली. मात्र, या दोघांची झुंज भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. भारतीय संघाचा डाव 265 धावांवर आटोपला आणि पाकिस्तानने 48 धावांनी विजय मिळवला.
‘शाहबाज आणखी दोन षटके टिकला असता तर…’
सामन्यानंतर तिलक वर्माने संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. अभिषेक शर्माने दिलेली आक्रमक सुरुवात आणि शाहबाजसोबत झालेली भागीदारी महत्त्वाची होती, असे त्याने सांगितले. आम्ही धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असताना शाहबाज बाद झाला. तो आणखी दोन षटके खेळपट्टीवर टिकला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता आणि कदाचित मी सामना संपवू शकलो असतो, असे तिलकने म्हटले.
तसेच, भारतीय फलंदाजांनी सातत्याने विकेट गमावल्या नसत्या, तर 47 किंवा 48 व्या षटकातच विजय मिळवता आला असता, अशी खंतही त्याने व्यक्त केली. स्वतःचे शतक महत्त्वाचे असले तरी संघाचा विजय अधिक महत्त्वाचा असल्याचे तिलकच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले.










