अक्कलकोट, दि.२४ : मागच्या दोन दिवसांपासून कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे बोरी आणि हरणा नदीवाटे मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. या पार्श्वभूमीवर कुरनूर धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले असून धरणातून शुक्रवारी सकाळी अठराशे क्युसेक पाणी खाली सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला असून तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
गुरुवारी संध्याकाळी पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे क्यूसेक पाणी खाली सोडले होते त्यानंतर पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याचे लक्षात आल्यानंतर हळूहळू विसर्गात वाढ करण्यात आली. यासाठी पाटबंधारे विभागाची टीम रात्रभर धरणावर कार्यरत होती.पाण्याचा फ्लो ज्या पद्धतीने येत होता. त्या पद्धतीने धरणाचा विसर्ग करून पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभागाने केला.
शुक्रवारी सकाळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बोरी उमरगेजवळचा मैंदर्गीकडे जाणारा मोठा पूल या पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती. उशिरा पुलावरचे पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली.
सध्या देखील बोरी नदी काठोकाठ भरून वाहत असून कोणत्याही क्षणी पुन्हा पाणी वाढू शकते आणि पुन्हा निसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाळा संपेपर्यंत कायम सतर्क राहावे,असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.