अक्कलकोट : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अक्कलकोट शहराच्या पाणी प्रश्नात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
लक्ष घातले असून लवकरच या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबद्दल ठोस निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी अक्कलकोटच्या शिष्टमंडळाला दिले आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नांसंबंधी त्यांना निवेदन दिल्यानंतर पवार बोलत होते.
अक्कलकोट शहराची लोकसंख्या साठ हजाराच्या आसपास आहे त्यासाठी सध्याची पाणीपुरवठा यंत्रणा जी आहे ती तोकडी पडत आहे. फक्त कुरनूर धरणावर सध्या अक्कलकोट शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे तसेच जी वितरण व्यवस्था आहे ती देखील जुनी आणि जीर्ण झालेली आहे ती पूर्णपणे नव्याने बदलून घ्यावी आणि शहरासाठी स्वतंत्र मोठा जलकुंभ घ्यावा तरच शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी भेटणार आहे,असे सिद्धे यांनी पवार यांना सांगितले. केवळ वितरण व्यवस्था चांगली नसल्यामुळे शहरवासीयांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यानंतर पवार यांनी तातडीने लक्ष घालत बैठक लावण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. अक्कलकोट तीर्थक्षेत्र बस स्थानका साठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रातील १९ बसस्थानकासाठी तत्कालीन सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकीच काही बसस्थानकांना निधी देखील मिळाला आहे परंतु अक्कलकोटचे बसस्थानक मंजूर असूनही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. सध्या हे बस स्थानक असून अडचण नसुन खोळंबा असे झाले आहे.हे बसस्थानक खुप जुने झाले असून ते कधीही पडण्याची किंवा त्यापासून प्रवाशांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बसस्थानक इंदापूर आणि पंढरपूरच्या धर्तीवर नव्याने बांधण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले. त्याशिवाय अक्कलकोटच्या बंद पडलेल्या श्री स्वामी समर्थ कारखान्यावर देखील चर्चा झाली.
शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा कारखाना सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे हा कारखाना भाडेतत्वावर का होईना चालविण्यास देऊन शेतकऱ्यांचे हित साधले जावे ,अशी मागणी यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी जी. पी. कदम, यतीराज सिद्धे आदी पदाधिकारी उपस्थित होते.