---Advertisement---

जूनपासून शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटील

By team
On: March 8, 2026 3:57 PM
Follow Us:
---Advertisement---

सांगली : वृत्तसंस्था 

राज्यातील मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि सबलीकरणासाठी येत्या जून महिन्यापासून शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील  यांनी रविवारी केली. तसेच ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा २ हजार रुपयांचे मानधन देण्याची घोषणाही त्यांनी केली.

जागतिक महिला दिनानिमित्त सांगली येथे कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे एक हजार मुलींना यलो बेल्ट ग्रेडचे प्रमाणपत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, महिला सबलीकरणासाठी केवळ महिलांनीच नव्हे तर संपूर्ण समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक प्रयोग राबविण्यात आला. त्याअंतर्गत ५० शाळांमधील सुमारे ३६ हजार मुलींना दर शनिवारी एक तास कराटे आणि ज्युडोचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी १५ हजार ४०० मुलींना पहिला यलो बेल्ट देण्यात आला असून पुढील बेल्टसाठी लागणारे शुल्क प्रशासनाकडून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच येत्या जूनपासून राज्यातील प्रत्येक शाळेत मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठी-काठी तसेच विविध मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. सध्या राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे पाच लाख मुलींना कॉलेज फी आणि वसतिगृह शुल्क माफ करण्यात आले असून ‘कमवा व शिका’ योजनेतून दरमहा दोन हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह विविध अधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. महिला सुरक्षेसाठी आणि मुलींच्या आत्मविश्वासात वाढ करण्यासाठी सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!